विचारसरणी
आजकाल जो तो आपली यथाकथित विचारसरणी मांडण्याच्या, थोपण्याच्या नादात जगत आहे. विचारसरणी ... शब्दचं किती भारदस्त. खरं म्हणजे इतक्या गाज्यावाज्यात प्रदर्शन करण्यासाठी वापरण्यायोग्य हा शब्द नाही. तितकाच अगदीच दुर्लक्ष करून त्याची बेइज्जती करण्यासारखाही हा शब्द नाही. आज प्रत्येक माणूस या शब्दाच्या व्यसनात म्हणा, गराड्यात म्हणा, पार फसलाय.
'Turning and turning in a widening gyre', W. B. Yeats च्या 'Second Coming' मधील ओळीची आठवण झाली . एका फार पोकळ अशा जगात जणू आमची ही विचारसरणी आम्हांला नेवून ठेवते आणि आम्ही मात्र असं भासवतो की जणू एखाद्या प्रगाढ शास्त्राची निर्मितीचं आम्ही करतोय की काय !
Aristotle ला Fine Art चा जितका गवगवा नसेल, तितका तो आम्हांला आमच्या प्रतिबद्ध विचारसरणीबद्दल असतो .
यातून निर्माण होते ती समाजातील स्पर्धा, विचारसरणीच्या अर्थाचा विपर्यास, आपापले रंग, विचार, झेंडे घेऊन रस्त्यावर माणूसपणाला हसविणारे किंवा रडविणारे कृत्य करून मग आम्ही वातानुकूलित खोलीत बसून माणूसकीला कशी आमची विचारसरणी योग्य मार्गदर्शन करते, ते सांगतो. उपहासात्मक वाटत नाही का ?
मला तरी वाटते, माणसाचे भले व्हावे, विचारशक्ती वाढावी म्हणून या अतिशय विचारवादी गोष्टींचा जन्म झाला, किंबहुना व्हावा. पण जर आज याच विचारांमुळे विचारांना बंधन मिळत असेल, एकसुरीपणा, रटाळपणा, 'रोबोटिकी 'करण होत असेल, तर ते विचार 'विचार' म्हणावेत का ?
एका विचारासाठी दुसऱ्या विचारावर आंधळेपणाने टिपणं करणे, बोटं लावणे किती शिक्षितपणाचे लक्षण आहे ? मग मुळात आम्ही शिक्षित झालो आहोत का ? एक माणूस म्हणून प्रत्येकाला ज्याची त्याची जागा मिळायला हवी, विचार हवेत, ही गोष्ट फक्त पुस्तकी विचार बनत असेल तर त्याचा काय अर्थ ?
मुळात विचारसरणीच्या मागे डोळे झाकून का रहावे ? कारण ही गोष्ट जन्माला घालणे हे मानवीच कृत्य आहे. कुणीही माणूस जर परिपूर्ण नाही , तर त्याचे विचार परिपूर्ण कसे असतील ? असले तरी त्याचा वापर तो त्याच काटेकोरपणे करेल याची शाश्वती देणारा हरिश्चंद्र या युगात मिळेल का ? मग जर प्रत्येक विचार माणसाप्रमाणे पूर्ण नाही, तर त्यामागे आपलं चालतं डोकं बंद करून मिरविण्यात काय माणूसकी ?
याचा अर्थ असाही नाही की विचारांची गरज नाही. 'विचार हवेत, मात्र त्यांच्या धारा चाकू, सुरीप्रमाणे नकोत, की ज्यामुळे माणूसकीचे सगळे दोरखंड छाटून पडायला व्हावेत.'
जरी प्रत्येक विचार परिपूर्ण नसतो, तरी तो अर्थहीनही नसतो. मग आता गरज आहे, चांगल्या गोष्टी घेऊन त्यानुसार जगायची. एकाच गोष्टीमागे लागून स्वतःला बंधनात ठेवण्यापेक्षा सगळीकडून चांगलं घेऊन काहीतरी सर्वोत्तम घडण्यात, घडविण्यात काय वाईट आहे ? यामुळे सर्वांत चांगली ही गोष्टही घडेल की, आपापल्या वर्तुळात राहणाऱ्या लोकांच्या यथाकथित 'society' म्हणविल्या जाणाऱ्या खोट्या, मिथ्या, भ्रामक घटकाला छेद मिळून खऱ्या अर्थाने 'समाज ' बनेल .
जेव्हा माणूस एखादा विचार जोपासतो, तो त्याला शरण जातो, तो आपल्याच विचारांशी मिळत्याजुळत्या लोकांशी समरसून राहतो, पण बाकीच्या लोकांशी मात्र त्याचे हाडवैरच निर्माण होते. मग समाजात 'गट ' बनतात. गटांगटांतून 'समाज 'निर्माण झालाय, इतिहास हेच आपल्याला सांगतो. मात्र आता परत 'समाजा 'तून 'गटे ' निर्माण होत आहेत . आपल्यापेक्षा तर आदिमानव 'sapien' होता म्हणजे !गटांतून एकजिनसी समाज निर्माण होऊ शकत नाही, ही एक मोठी शोकांतिका आपण एखाद्या विचारधारेमागे राहून विसरतो. एखादी विशिष्ट विचारसरणी जोपासणे, हा महाभयंकर रोग आहे. विचारसरणीचा जन्म माणसाला सुसंस्कृत करण्यासाठी झाला, मग हे कोणते 'सुसंस्कृतीकरण ' सध्या चालतंय असे म्हणायचे ?
मग हे टाळण्यासाठी सगळ्यांच्या ताटामधून थोडं थोडं अन्न घेतलं, तर किती छान आहार बनेल, त्यातून किती छान सकस आरोग्य बनेल. समाजाच्या सुयोग्य आरोग्यासाठीही हेचं लागू होतं.
'एकमेकां साहाय्य करू,
अवघे धरू सुपंथ ... '
ह्या ओळी उगाचच नाही म्हटल्या गेल्यात पण याला खऱ्या अर्थाने राबविणे गरजेच बनलंय सध्या. मुळात विचारसरणीमुळे तुकडे करून घेण्यापेक्षा तुकड्यां-तुकड्यांमधून एकत्र राहण्याची, एकमेकांना न दुखविण्याची अवाच्य, अलिखित विचारसरणी जर आपण आत्मसात केली, तर काय वाईट आहे ?
विशिष्ट विचारसरणीचा सर्वांत वाईट परिणाम तरुणांवर होतो. विचारसरणीला कधीच हे पोट, ज्यासाठी सगळे उद्योग चालतात, किंबहुना चालायला हवे; दिसत नाही. उलट या विचारसरणीच्या उगाचच्या उद्योगांमध्ये लागल्यावर करायला हव्या, अशा गोष्टींची, उद्योगपाण्याची आम्हांला आठवण तरी होते का ? ती खोटी झिंग नशेप्रमाणे नसांनसांत भिनते आणि तरुणवयात जे करायला हवे, ते सर्व बाजूला राहते. बिना नशापानाची 'उडता पंजाब ' सारखी स्थिती आमची होते. कारण रक्त कोवळं आहे, तरुण आहे, त्यामुळे वाईट प्रवृत्तीचा संसर्ग व्हायला वेळ लागत नाही. त्यातून मग निर्माण होतात विनाकारणाचे, विचित्र प्रश्न ... ज्याचे उत्तर मिळणे रोजगार मिळण्यापेक्षा जटिल बनतं आणि याच 'भुलभुलैय्या'त आजचा तरुण आपले जीवन दान करतो. फलनिष्पत्ती काय तर खोटी आशा, भरकटलेली, यात दडपल्या गेलेली, बर्बाद झालेली तरुणाई ...
आणि मग एक संघर्ष सुरु होतो, जो निष्कारण, अव्याहत,अनिर्बंध निराश काळासाठीचा असतो. आपल्या विचारांची सुधारणा करण्यासाठी जोपासलेली विचारसरणी आपल्या 'विचारकैदी ' बनविते आणि हळूहळू 'विचारशून्य'ही ...