एक काळरात्र ठरलेली सकाळ
कोण म्हणतं की हरण्यात पुरुषार्थ नाही ? 'पानिपत ' अशा पराभवाची कहाणी आहे , ज्यात स्वयंभूना , मर्दांना जिंकण्याचीही गरज नसते हे दिसून येते . 'हारकर भी बाजी जितनेवाले को बाजीगर कहते है ।' हे विधान विनासायास नव्हे . जर विजय होऊनही अब्दाली आमच्या मायकडे परत बघण्याची दृष्टीही आणू शकला नाही , तर यापेक्षा वेगळा 'विजय ' तो कोणता ? जर आजही उत्तर भागात अब्दाली , नजीब यांच्या कथांऐवजी सदाशिव भाऊंवरील पोवाडे गायले जातात , तर यापेक्षा 'विजय ' तो काय असतो ? अख्ख हिंदुस्थान हातात घेण्यासाठी आलेल्या घुसखोरांच्या मक्तेदारीऐवजी 'भाऊपूर' हे गाव वसतं , यापेक्षा मोठा 'विजय ' तो कोणता ?कटकारस्थानं करणाऱ्या विरोधी माणसांच्या त्या वणव्यात , जिथे साक्षात प्रकृती आपल्या विरोधी होती , तेथे लाचार आपण काय करणार होतो ? दक्षिणायनानंतर सूर्याच्या स्थितीतील स्थित्यंतरे ; पालापाचोळाही ज्यांच्या नशिबी नव्हता ती जनावरे आणि सर्वांत भाग्यवान म्हणजे आमची पाण्यावर जगणारी , उपाशी असणारी फौज त्यात मांसाहारही रास नसणाऱ्या आमच्या माणसांना सहन करावी लागणारी मृतदेहांची दुर्गंधी ; त्यातून शरीर काय मनही क्षीण करणारे रोग ; गारठवणाऱ्या थंडीत त्यासाठी पूर्णपणे सज्ज असणाऱ्या फौजेविरोधी , तिची थोडीही सवय नसणारे , अपूर्ण वस्त्रातले आपले सैन्य काय कल्पना होती की , निसर्गही बेईमान होईल .
आपलं घर , बायका पोरं यांची चिंता डोक्यात घेऊन रणांगणावर अर्धे सैन्य आडवं पडल्यावर जी मनाची घालमेल होत असेल , विचार तरी करवतो का ? १४ जानेवारी १७६१ चा तो 'संक्रांतीचा ' दिवस महाराष्ट्रातील सर्व घरांवर काळ्या छायेसारखा अशुभ ठरला . काय करायला हवे होते , नको होते , याचा विमर्श करण्यात आता अर्थ नाही . पण हे बलिदान अर्थशून्य नव्हतेच . अर्धी सेनाही नसतांना निधड्या छातीने सामोरे जाण्याचे धाडस फक्त मराठी माणूस करू शकतो , हे जगमान्य झाले ते या लढाईने .
'कोण म्हणतं पानिपत काही देऊन गेलं नाही ,
हारुनही दिमाखात आठवल्या जाण्याचं भाग्य पानिपतात आहे !'
कधीकधी हरणं माणसाला जिंकण्यापेक्षा महत्वपूर्ण ठरतं , कारण त्यातून जो अनुभव मिळतो , तो मौल्यवान असतो .
'रणांगणावर जरी आपलं पानिपत झालं ,
बाहेरचा रस्ता दाखविण्याचं कसब आपल्या सगळ्यांत आहे .'
आपल्याच मातृभूमीच्या रक्षणासाठी बलिदान देण्याची तयारी असणाऱ्या शूरवीरांनाच वीरगती प्राप्त व्हावी , याला सुदैव कि दुर्दैव हेच कळत नाही . असो ... पानिपतची ती भूमी पावन झाली ती आपल्या शूरवीरांच्या कर्तृत्ववान रक्ताने , या लढाईनेच आपल्याला विपरीत अशा परिस्थितीतही हार न मानायला शिकविले .
एखाद्या जिंकलेल्या लढाईपेक्षाही एखादी हरलेली लढाई माणसाला कशी जिंकायला शिकवितो किंबहुना प्रवृत्त करते , यापेक्षा विलक्षण व अदभूत तरी काय असतं ? अख्ख्या इतिहासात अशी काळरात्र ठरलेली 'सकाळ' नसेल, तरी तिच्या वीरगाथा गेल्या जाव्यात , हे स्वतःमध्ये एक आश्चर्य आहे .
नशीब हे काय असत किंवा काही गोष्टी कशा आपल्या हातात नसतात याचा उत्तम दाखला 'पानिपतने ' जणू दिला. सगळ्या बाबी जरी विपरीत होत्या किंबहुना झाल्यात तरीही आजही तेथील सन्मानार्थ उभी ठाकलेली शिळा आपल्या उत्तुंग यशाची साद देते ,
'वीरमरण व्यर्थ जाण्यासाठी नसतं ,
ते कधीही असामान्य असतं ! '
पानिपतची आठवण व ती संक्रांत आपल्याला हे शिकवून जाते .
पानिपतमध्ये वीरगती प्राप्त झालेल्या हार एक स्वातंत्र्याच्या शिलेदाराला मनाचा मुजरा ...
No comments:
Post a Comment