'नोकरी व घर सांभाळत बनली CA',
एवढ्यातचं ऐकलेली बातमी आहे. का कुणास ठाऊक, या बातमीकडे बघून आनंद कमी पण दुःख झाले. असं नाही, कि त्यांच्या प्रगतीचे दुःख झाले, बस वाईट वाटलं का प्राधान्य कशाला दिल आहे ते. अश्या किती तरी कर्तृत्वाच्या गाथा सांगणाऱ्या बातम्या लक्ष वेधून घेतात. पण यात मेख आहे खरी. मखमली कापडात खंजर दिसावं, तस काहीसं या गोष्टी ऐकून होतं.
बायकांनी शिक्षण घ्यावं, नोकरी करावी यासाठी समाज मार्ग मोकळा करत आहे. पण त्याआधी तिने घर आवरावं आणि मगचं बाहेरचा जाण्यासाठी दरवाजा उघडला जाईल, असा अट्टाहास का ? हा कोणता न्याय आहे ? हीच का ती समानता ?
हा शुद्ध ढोंगीपणा आणि उघड फसवेगिरी आहे. संसारात जितकी जबाबदारी स्त्रीची आहे तितकीच पुरुषाची का नसावी ? थोडं जास्त लक्ष दिल तर त्याच्या पुरुषार्थाला ठेच पोहोचते का ?
बायकांसाठीची 'Superwoman' ही संकल्पना त्यांच्या न जाणतेपणामुळे त्यांचाच बळी घेते. आपले हक्क जसे आपल्याला माहित असतात, तसेच कर्तव्यही पार पाडता यायला हवेतचं. मुळात इतक्या उच्च विचारांची ठेव असणाऱ्या देशात स्त्री विषयी हा साधा विचार न व्हावा याचे आश्चर्य वाटते. त्यात सद्याच्या धकाधकीच्या काळात तिची दोन्ही ठिकाणी होणारी फरफट तिची शुद्ध पिळवणूक आहे. घरच्या सगळ्या कामाचा ठेका स्त्रीयांनीच नेहमी का घ्यावा ?
आदिम काळात शारीरिक कमजोरीमुळे म्हणा किंवा मातृत्व व इतर गोष्टींमुळे म्हणा, स्त्री घर सांभाळायची, मुले सांभाळायची आणि पुरुष शिकार करायचा, त्यामुळे बाहेरचे जग बघायचा. पुढे हेच बराच काळ चालत राहिले. बाकीच्या देशात मात्र आपण या पद्धतीत बदल झालेलं बघतो. मात्र आपल्याच 'संस्कृती संवर्धन' करणाऱ्या देशात आजही 'आदिम' काळातील पद्धत अस्तित्वात आहे. याकडे काही पुरुष द्वेषाने बघतील किंवा त्यांना हे 'Feminism' वाटेल पण स्त्री 'Female' होण्यासाठी 'Human' आहे. याचा विसरचं पडलाय न आपल्याला कधीचाच !
अपेक्षांच्या ओझ्याखाली मुळातच 'Physically weak' स्त्रीला आणखीनच कमजोर बनविल्या जाते. काय वाईट होईल जर पुरुषाने तिला जास्त नाही, पण जमेल तितकी मदत केली तर ?
एकाच प्रकारचे काम करून घरी आल्यावर त्याला बसून चहा - नाश्ता लागतो. तिला मात्र त्याच्यासाठी तो आधी बनवावा लागतो. मग जेवणाची तयारी, घरची कामे, मुलांकडे लक्ष आणि काय काय नाही. घरी आल्यावर खरं म्हणजे आराम दोघांना लागतो. पण ती घरच्या कामात आराम विसरून जाते. सकाळची तिची क तिलाच माहित ! शिवाय सुट्टीच्या दिवशीही कामांपासून फुरसत नसते.
स्त्रियांना शिकवून त्यांच्यावर जितके यथाकथित 'उपकार' झालेत, त्यापेक्षा कित्येक पटीने त्यांच्यासाठी 'Superwoman' च्या अपेक्षेने अन्याय झाले आहेत, नाही का ?
शेवटी काय, घरात असो व बाहेर, तिची सुटका होणे नाही. ती एक मिथ्या कल्पना आहे.
No comments:
Post a Comment