गांधीजींचे तीन माकड संदेश देतात, 'बुरा मत कहो', 'बुरा मत सुनो' आणि 'बुरा मत देखो'. कदाचित याचा उलट अर्थ घेण्याची पद्धत सध्याच्या पिढीची आहे. आम्ही तर वाकड्यातच बोलणार, वाईट ऐकण्याच्या बाबतीत तर आमचा हात कोणी धरू शकत नाही, आणि कोणत्या गोष्टी आम्ही चवीने बघतो, ते तर विचारूच नका. एखाद्या गोष्टीचा विपर्यास कसा छान पद्धतीने केला जातो याचं हे उत्कृष्ट उदाहरण आहे. मुळात शुद्ध, उत्तम असं काही राहिलंच कुठं आता ? जो तो स्वतःला 'तीस मार खान' समजून स्वतःच्या चुकीच्या गोष्टीही दुसऱ्यावर थोपवण्याचा नादात राहतो. आज जगात चुकीचा म्हणून कुणीच नाही, मुळात कुणालाच व्हायचेही नाही. चूक न होणे, करणे स्वागतार्ह आहे. मात्र चूक असूनही मान्य न करणे, येथे मोठा घोळ निर्माण होतो.
आजची पिढी यथाकथित 'Vast' आहे. या 'Fast and furious' युगात ती 'Advance' होण्यात कुठलीच कसर सोडत नाही. मग त्यासाठी ती सध्या 'In' असलेल्या गोष्टींमागे लागते. मग 'In' काय तर सगळ्या वर-वरचा भंपक विचारांचा कचरा ! कारण सद्विवेकी, सत्शील विचार आता 'out' झालेत. आम्हांला इतकं कालबाह्य व्हायचं नाहीयं ! मग येथून सुरु होतो संघर्ष ... तोही एका विचित्र, वाईट प्रवृत्तीचा ... ही प्रवृत्ती विधिवत नाही, ही प्रवृत्ती योग्यही नाही, पण ती काळाच्या अनुसार निर्माण होत आहे. मग ती कशी आहे, याचं परीक्षण करण्याची फुरसत इथं आहे कुणाला ? या प्रवृत्तीमुळे मग
लोकांचे विचार बधिर होतात. योग्य, अयोग्यामध्ये एक पुसट रेघ तयार होते. मग केव्हा आपण या रावणरूपी प्रवृत्तीच्या 'Hypnotism' मुळे मर्यादांची लक्ष्मणरेखा ओलांडतो, ते आपल्यालाही कळत नाही. बेभान, बेधुंद आपण बस 'Fashion' म्हणून सगळं आपसूक करत जातो.
पुढं मग आपल्याला आपले सद्विवेकी विचार राहत नाहीत. 'जे चालतं, ते चालतं' असा नियम आपण पाळायला लागतो. मग ते काय, कसे, कोठून आले, याचा काहीच संबंध आपल्याला नको असतो. त्यामुळे आपलं खरंच भलं होईल कि आपण भरकटू यावरही आपण विचार करत नाही. 'विचार गहाण ठेवणे' ज्याला म्हणतात, कदाचित ती हीच स्थिती असावी.
शिक्षणाचा संबंधही यात लावला जातो. 'आम्ही शिकलोय, मग आमचं बरं - वाईट आम्हांला माहित' असंही ही उत्साही मंडळी म्हणते. पण यांना 'शिक्षण' आणि 'शहाणपण' यांतील अंतर कदाचित माहित नाही. फक्त शिक्षणाने शहाणपण येत नाही आणि शहाणपणाला फक्त शिक्षणाची गरज नाही. असो ... आपल्यापेक्षा अशी कृती करणारी ही मंडळीच याचा चांगला संबंध लावू शकतात. शेवटी ते शिकलेत आणि त्यांना त्यांचं बर वाईट कळतं.
मला तर वाटतं की, आता 'चांगला' शब्दाची परिभाषाच बदलली असेल किंवा 'Validity' तर संपली असेलच कारण 'जे वाईट आहे, तेच आता चांगलं म्हटल्या जातं'. म्हणून मग आम्ही तीन माकडांची चेष्ठाच करतो. मग पूर्वीचे ज्ञानरंजक कार्यक्रम वगैरे बघण्याच्या भानगडीत आम्ही पडतंच नाही. आमच्या डोळ्यांनाही चव आहे खरी ! आणि आम्ही भजन, कीर्तन, हितोपदेश संदेश याची हवाही घेत नाही. धांगडधिंगा कशाला म्हणतात, तेच तुम्ही आमच्याकडून शिका ! आणि हो ... 'Gossiping' च्या युगात अपेक्षाचं कशी करता तुम्ही, आम्हाला लोणच्यासारख्या चटकदार गोष्टी चाखायला लागतात.
येथूनच खरी 'Generation Gap' ची सुरुवात होते. पण हा 'Gap' खोल दरीइतपत मोठा नकोचं, कमी - जास्त फरक ठीक आहे. पण पूर्णतः अयोग्य परिवर्तन तरी काय कामाचे ? मग मागच्या पिढीच्या अनुभवांचा काय उपयोग ? विधात्याच्या या भल्यामोठ्या कष्टदायी प्रयोजनाचा काय उपयोग ? बऱ्याचदा 'मेरी सुनो' वर्गातले लोक आपल्याला आढळतात. चांगल्या गोष्टींसाठी ते योग्य आहे. मात्र उगाच काहीतरी लादण्यासाठी म्हणून दमदाटी करणे आपल्याला पटते तरी का ?
असो, मुळात पूर्णतः वाईट काहीच नाही आणि नसतंच. पण पूर्णतः चांगलं होण्याचा प्रवास थांबल्यास तो हेतू साध्या कसा होईल. आणि थोडं आपण 'दिड - शहाणपणा' कमी केला, तर अगदी योग्य प्रमाणात माफक शहाणपण मिळत असल्यास, ते आत्मसात करण्यात काय वाईट आहे बरे ?
No comments:
Post a Comment