Superwoman ...

Superwoman ... 

'नोकरी व घर सांभाळत बनली CA', 
एवढ्यातचं ऐकलेली बातमी आहे. का कुणास ठाऊक, या बातमीकडे बघून आनंद कमी पण दुःख झाले. असं नाही, कि त्यांच्या प्रगतीचे दुःख झाले, बस वाईट वाटलं का प्राधान्य कशाला दिल आहे ते. अश्या किती तरी कर्तृत्वाच्या गाथा सांगणाऱ्या बातम्या लक्ष वेधून घेतात. पण यात मेख आहे खरी. मखमली कापडात खंजर दिसावं, तस काहीसं या गोष्टी ऐकून होतं. 
बायकांनी शिक्षण घ्यावं, नोकरी करावी यासाठी समाज मार्ग मोकळा करत आहे. पण त्याआधी तिने घर आवरावं आणि मगचं बाहेरचा जाण्यासाठी दरवाजा उघडला जाईल, असा अट्टाहास का ? हा कोणता न्याय आहे ? हीच का ती समानता ?
हा शुद्ध ढोंगीपणा आणि उघड फसवेगिरी आहे. संसारात जितकी जबाबदारी स्त्रीची आहे तितकीच पुरुषाची का नसावी ? थोडं जास्त लक्ष दिल तर त्याच्या पुरुषार्थाला ठेच पोहोचते का ? 
बायकांसाठीची 'Superwoman' ही संकल्पना त्यांच्या न जाणतेपणामुळे त्यांचाच बळी घेते. आपले हक्क जसे आपल्याला माहित असतात, तसेच कर्तव्यही पार पाडता यायला हवेतचं. मुळात इतक्या उच्च विचारांची ठेव असणाऱ्या देशात स्त्री विषयी हा साधा विचार न व्हावा याचे आश्चर्य वाटते. त्यात सद्याच्या धकाधकीच्या काळात तिची दोन्ही ठिकाणी होणारी फरफट तिची शुद्ध पिळवणूक आहे. घरच्या सगळ्या कामाचा ठेका स्त्रीयांनीच नेहमी का घ्यावा ? 
आदिम काळात शारीरिक कमजोरीमुळे म्हणा किंवा मातृत्व व इतर गोष्टींमुळे म्हणा, स्त्री घर सांभाळायची, मुले सांभाळायची आणि पुरुष शिकार करायचा, त्यामुळे बाहेरचे जग बघायचा. पुढे हेच बराच काळ चालत राहिले. बाकीच्या देशात मात्र आपण या पद्धतीत बदल झालेलं बघतो. मात्र आपल्याच 'संस्कृती संवर्धन' करणाऱ्या देशात आजही 'आदिम' काळातील पद्धत अस्तित्वात आहे. याकडे काही पुरुष द्वेषाने बघतील किंवा त्यांना हे 'Feminism' वाटेल पण स्त्री 'Female' होण्यासाठी 'Human' आहे. याचा विसरचं पडलाय न आपल्याला कधीचाच !
अपेक्षांच्या ओझ्याखाली मुळातच 'Physically weak' स्त्रीला आणखीनच कमजोर बनविल्या जाते. काय वाईट होईल जर पुरुषाने तिला जास्त नाही, पण जमेल तितकी मदत केली तर ?
एकाच प्रकारचे काम करून घरी आल्यावर त्याला बसून चहा - नाश्ता लागतो. तिला मात्र त्याच्यासाठी तो आधी बनवावा लागतो. मग जेवणाची तयारी, घरची कामे, मुलांकडे लक्ष आणि काय काय नाही. घरी आल्यावर खरं म्हणजे आराम दोघांना लागतो. पण ती घरच्या कामात आराम विसरून जाते. सकाळची तिची क तिलाच माहित ! शिवाय सुट्टीच्या दिवशीही कामांपासून फुरसत नसते. 
स्त्रियांना शिकवून त्यांच्यावर जितके यथाकथित 'उपकार' झालेत, त्यापेक्षा कित्येक पटीने त्यांच्यासाठी 'Superwoman' च्या अपेक्षेने अन्याय झाले आहेत, नाही का ? 
शेवटी काय, घरात असो व बाहेर, तिची सुटका होणे नाही. ती एक मिथ्या कल्पना आहे. 

शहाणपण देगा देवा ...

शहाणपण देगा देवा ... 

गांधीजींचे तीन माकड संदेश देतात, 'बुरा मत कहो', 'बुरा मत सुनो' आणि 'बुरा मत देखो'. कदाचित याचा उलट अर्थ घेण्याची पद्धत सध्याच्या पिढीची आहे. आम्ही तर वाकड्यातच बोलणार, वाईट ऐकण्याच्या बाबतीत तर आमचा हात कोणी धरू शकत नाही, आणि कोणत्या गोष्टी आम्ही चवीने बघतो, ते तर विचारूच नका. एखाद्या गोष्टीचा विपर्यास कसा छान पद्धतीने केला जातो याचं हे उत्कृष्ट उदाहरण आहे. मुळात शुद्ध, उत्तम असं काही राहिलंच कुठं आता ? जो तो स्वतःला 'तीस मार खान' समजून स्वतःच्या चुकीच्या गोष्टीही दुसऱ्यावर थोपवण्याचा नादात राहतो. आज जगात चुकीचा म्हणून कुणीच नाही, मुळात कुणालाच व्हायचेही नाही. चूक न होणे, करणे स्वागतार्ह आहे. मात्र चूक असूनही मान्य न करणे, येथे मोठा घोळ निर्माण होतो. 
आजची पिढी यथाकथित 'Vast' आहे. या 'Fast and furious' युगात ती 'Advance' होण्यात कुठलीच कसर सोडत नाही. मग त्यासाठी ती सध्या 'In' असलेल्या गोष्टींमागे लागते. मग 'In' काय तर सगळ्या वर-वरचा भंपक विचारांचा कचरा ! कारण सद्विवेकी, सत्शील विचार आता 'out' झालेत. आम्हांला इतकं कालबाह्य व्हायचं नाहीयं ! मग येथून सुरु होतो संघर्ष ... तोही एका विचित्र, वाईट प्रवृत्तीचा ... ही प्रवृत्ती विधिवत नाही, ही प्रवृत्ती योग्यही नाही, पण ती काळाच्या अनुसार निर्माण होत आहे. मग ती कशी आहे, याचं परीक्षण करण्याची फुरसत इथं आहे कुणाला ? या प्रवृत्तीमुळे मग
लोकांचे विचार बधिर होतात. योग्य, अयोग्यामध्ये एक पुसट रेघ तयार होते. मग केव्हा आपण या रावणरूपी प्रवृत्तीच्या 'Hypnotism' मुळे मर्यादांची लक्ष्मणरेखा ओलांडतो, ते आपल्यालाही कळत नाही. बेभान, बेधुंद आपण बस 'Fashion' म्हणून सगळं आपसूक करत जातो. 
पुढं मग आपल्याला आपले सद्विवेकी विचार राहत नाहीत. 'जे चालतं, ते चालतं' असा नियम आपण पाळायला लागतो. मग ते काय, कसे, कोठून आले, याचा काहीच संबंध आपल्याला नको असतो. त्यामुळे आपलं खरंच भलं होईल कि आपण भरकटू यावरही आपण विचार करत नाही. 'विचार गहाण ठेवणे' ज्याला म्हणतात, कदाचित ती हीच स्थिती असावी. 
शिक्षणाचा संबंधही यात लावला जातो. 'आम्ही शिकलोय, मग आमचं बरं - वाईट आम्हांला माहित' असंही ही उत्साही मंडळी म्हणते. पण यांना 'शिक्षण' आणि 'शहाणपण' यांतील अंतर कदाचित माहित नाही. फक्त शिक्षणाने शहाणपण येत नाही आणि शहाणपणाला फक्त शिक्षणाची गरज नाही. असो ... आपल्यापेक्षा अशी कृती करणारी ही मंडळीच याचा चांगला संबंध लावू शकतात. शेवटी ते शिकलेत आणि त्यांना त्यांचं बर वाईट कळतं. 
मला तर वाटतं की, आता 'चांगला' शब्दाची परिभाषाच बदलली असेल किंवा 'Validity' तर संपली असेलच कारण 'जे वाईट आहे, तेच आता चांगलं म्हटल्या जातं'. म्हणून मग आम्ही तीन माकडांची चेष्ठाच करतो. मग पूर्वीचे ज्ञानरंजक कार्यक्रम वगैरे बघण्याच्या भानगडीत आम्ही पडतंच नाही. आमच्या डोळ्यांनाही चव आहे खरी ! आणि आम्ही भजन, कीर्तन, हितोपदेश संदेश याची हवाही घेत नाही. धांगडधिंगा कशाला म्हणतात, तेच तुम्ही आमच्याकडून शिका ! आणि हो ... 'Gossiping' च्या युगात अपेक्षाचं कशी करता तुम्ही, आम्हाला लोणच्यासारख्या चटकदार गोष्टी चाखायला लागतात. 
येथूनच खरी 'Generation Gap' ची सुरुवात होते. पण हा 'Gap' खोल दरीइतपत मोठा नकोचं, कमी - जास्त फरक ठीक आहे. पण पूर्णतः अयोग्य परिवर्तन तरी काय कामाचे ? मग मागच्या पिढीच्या अनुभवांचा काय उपयोग ? विधात्याच्या या भल्यामोठ्या कष्टदायी प्रयोजनाचा काय उपयोग ? बऱ्याचदा 'मेरी सुनो' वर्गातले लोक आपल्याला आढळतात. चांगल्या गोष्टींसाठी ते योग्य आहे. मात्र उगाच काहीतरी लादण्यासाठी म्हणून दमदाटी करणे आपल्याला पटते तरी का ? 
असो, मुळात पूर्णतः वाईट काहीच नाही आणि नसतंच. पण पूर्णतः चांगलं होण्याचा प्रवास थांबल्यास तो हेतू साध्या कसा होईल. आणि थोडं आपण 'दिड - शहाणपणा' कमी केला, तर अगदी योग्य प्रमाणात माफक शहाणपण मिळत असल्यास, ते आत्मसात करण्यात काय वाईट आहे बरे ?

महिमा वयाचा ...

महिमा वयाचा ... 

जगात वेगवेगळ्या प्रकारांत फरक केले जातात. मुळात वयामुळे फरक करणे कधीकधी चुकीचेच ठरते. कारण बऱ्याचदा वाढतं वय समजदारी वाढवतंच असं नाही आणि कमी वय अल्लडपणा दाखवेलच असं नाही. 

मोठ्यांचे जसे आपण आशिर्वाद घेतो तसेच लहानांच्या प्रेमाचीही तितकीच आवश्यकता असते. नाहीतर आपण एकीकडे आशीर्वाद घेत राहत, दुसरीकडे लहानग्यांना त्रास देऊन तेच आशिर्वाद संपवत असतो. मग आयुष्याची 'बॅलन्स शीट' वाढेल कशी ? ती तर रिकामीच राहणार !

ज्याप्रमाणे थोरले 'आशिर्वाद' देऊन आपल्या पुण्याईच्या 'बॅलन्स शीट' मध्ये 'क्रेडिट' वाढवत ठेवतात, त्याचप्रमाणे धाकटे 'दुआँ' देऊन त्यात 'बरकत' करत असतात. त्यांचे प्रेम, आपुलकीची सर या मजा काही औरच ... 

बरे असेही नाही कि थोरले बऱ्याचदा शहाणे असतील. किंबहुना याबाबतीत धाकट्यांना मानावे लागेल. 'हुकूम मेरे आका' म्हणत सगळ्या जबाबदाऱ्या तेही लिलया पार पाडत असतात. एक विचार करा, जर त्यांनीच जबाबदारीचे पालन केले नाही तर ? धाकटेपणाचा विट त्यांनाही येत असेल हो ! असो, वयाच्या बाबतीतही एकप्रकारे विचार परिवर्तन होणे आवश्यकचं आहे कारण बऱ्याच जणांना यामुळे मोठेच होता येत नाही. 

अजिंठा . . .

  अजिंठा . . .  अजिंठा, तसाच हतबल, अबोल, तितकाच कठोर दिसणारा पण मनाने तितकाच मृदु, तितकाच देखणा, तितकाच अनुभवी, तितकाच पूर्ण व तितकाच अतृप्त...