सृजन
शब्दातच किती ते सामर्थ्य ! सृजन म्हटल्यावर आपल्याला अर्थबोध होतो , तो नाविन्याचा , नव्या जन्माचा , नव्या उमेदीचा , नव्या उत्स्फूर्ततेचा , एका अगदीच नव्या सोहळ्याचा ...बघायला गेलं तर थोडक्यातही याची व्याख्या करता येईल . पण कोणत्याही गोष्टीच्या 'श्रीगणेशाला ' अचानक सुरुवात होत नाही ... तशीच या शब्दाची व्याप्ती आहे ... तसंच या शब्दाचं सौंदर्य आहे . मग तो सृष्टी बघण्यासाठीचा घेतलेला जन्म असो वा एखाद्या व्यक्तीच्या विचारांना मिळालेला जन्म असो ... प्रत्येक ठिकाणी सृजन आहे .
जन्म म्हटल्यावर निसर्ग आठवतो कारण हि देणगी निव्वळ निसर्गाची देणं आहे . आणि निसर्ग म्हटल्यावर काहीतरी गूढ शक्तीची अमर्याद वास्तविकता बघायला मिळते . जे नैसर्गिक ते तितकंच गूढ .
मुळात या शब्दातच अनाकलनीय खोली आहे . जगात सर्व निसर्गनिर्मित आहे म्हणजे जगच एक गूढ आहे . माणसाच्या जन्माचं गूढ , मृत्यूनंतरच्या जगाचं गूढ ...हे गूढंच आहे . ज्यासाठी मनुष्य तर्कसंगत विचारांना आधार घेतो आणि त्याचा परिणामांकडे जाण्याचा प्रयत्न करतो . कारण या गुढाची व्याप्ती बघता प्रत्येक गोष्टीचं आपल्याला उत्तर मिळेलच असं नाही . व्यक्तीद्वारे जे विचार स्फुरले जातात , लेखनात येतात , तेही एक गूढच आहे . अचानक काही नसतांना एखाद्या गोष्टीवर , शब्दावर मनुष्य जो विचार मांडतो , तेही गूढच आहे . प्रत्येकाचा स्वतःचा एक असा पिंड असतो , तोही तितकाच गूढवादी आहे .
याचाच अर्थ सृजन म्हणजे काहीतरी गूढ , सर्वव्यापी , निराकार , निर्गुण , निरपेक्ष , अनाकलनीय , असिमित , अनपेक्षित , अव्यक्त , अपरिचित , अलिखित , अनिर्बंध , अकस्मात , अनिर्णायक आणि अमर्याद व खऱ्या अर्थाने 'अमरही '
जगात सर्व गोष्टींचा अंत निश्चित आहे . मात्र सृजनाचा अंत होणे नाही . ते नवचैतन्य आहे , नवनिर्मित आहे , अंताला कारण देणारे ते एकमेव अजेय वास्तव आहे ...
कारण ते 'सृजन ' आहे
No comments:
Post a Comment