माणसाने जगणं सोडायचं नसतं ,
कधी हसायचं असतं ,
कधी रडायचं असतं ,
पण आयुष्य जगायचं असतं !
नसतं नेहमी ऊन ,
मग पाऊस तरी कसा राहील ,
आपल्याला कितीही हवा असला ,
म्हणून माणूस सोबत कसा राहील !
बऱ्याचदा मनासारखं घडतं ,
तेव्हा मनसोक्त जगायचं असतं ,
जेव्हा येतो सुखांना थकवा ,
आपण शांत रहायचं असतं ...
मिळते कधीतरी अपेक्षेप्रमाणे ,
म्हणून नेहमीच अपेक्षा करायची नसते ,
नाही पेलवतं अपेक्षांना आपलंही ओझं ,
म्हणून हिरमुसून बसायचं नसतं ...
जीवन बरच काही शिकवतं म्हणे ,
हा तोच रस्ता आहे पथिका ,
नेहमीच जिंकून नाही येत शिकता ,
म्हणून कधीतरी हरायचं असतं ...
मिळतात काही जिवलग मित्र ,
म्हणून सगळेच मित्र बनत नाहीत ,
मीठ खारट असलं तरी ,
त्याच्याशिवाय जेवणाला चव येत नाही ...
जीवनात असतात अनेक नाती ,
त्यांत भावनांच्या असंख्य गुंतलेल्या गाठी ,
कधी सोडवून पहायचं असतं ,
कधी मात्र सोडून द्यायचं असतं ...
प्रत्येकवेळी नसतं पंचपक्वान्न ,
चटणी - भाकरीलाही वेगळीच चव असते ,
गच्च भरलेल्या पोटाला ,
उपवास करून हलकं करायचं असतं ...
कधी दिवास्वप्नंही सुखद असतात ,
कधी रात्री स्वप्न चटके देऊन जातात ,
म्हणून स्वप्न बघणं सोडायचं नसतं ,
जीवन आपण जगायचं असतं ...
सुचत जेव्हा शहाणपण ,
झोकून काम करायचं असतं ,
नाही सुचत जेव्हा शहाणपण ,
डोक्याला आराम द्यायचा असतो ...
ताट आहे वाढलेलं ,
ते असंच सोडून जायचं नसतं ,
जीवन असो कितीही दुर्धर ,
आपण ते जगायचं असतं !