अजिंठा . . .
अजिंठा, तसाच हतबल, अबोल, तितकाच कठोर दिसणारा पण मनाने तितकाच मृदु, तितकाच देखणा, तितकाच अनुभवी, तितकाच पूर्ण व तितकाच अतृप्त, डोळ्यांचे पारणे फेडणारे तितकेच त्याचे सौंदर्य, तितकाच अल्लड, तितकाच निरागस, तितकाच व्याकुळ, तितकाच खंबीर, तितकाच असहाय्य, अगदी पारोसारखा ...
पारो- रॉबर्टची प्रेमकहाणी कधीतरी पाठ्यक्रमात होती. वाचतांनाच आपलीशी जी आपली वाटली तितकाच आपलासा 'अजिंठा' चित्रपट पडद्यावरही आपलासा वाटला. कित्येक दिवस, ऋतू, वर्ष आले अन गेले पण अजिंठ्याचे तारुण्य अबाधित होते किंबहुना राहील.
विज्ञान म्हणतं, दगडांत जीव नसतो, निर्जीव वस्तू बोलू शकत नाही, त्यांना भावना नसतात. पण अजूनही जर अजिंठ्याला गेलात तर विश्वास करा, अजिंठ्याचं धडधडणारं हृदय तुम्हाला शहारे देऊन जाईल. रसिकाच्या चष्म्यातून बघितले तर जाणवेल की कृष्ण- धवल जरी भासले तरी अजिंठ्याचे अंत:करण बहुरंगी आहे. कठोर जरी लाभले तरी अजिंठ्याचे हृदय मवाळ आहे. विश्वकर्मानिर्मित या विश्वाच्या सर्वांत सुंदर मानवनिर्मित कलाकृतीचा तो उत्तम नमूना आहे. अजिंठा एक सुंदर कविता आहे, जिचे बोल युगानुयुगे माणसाला खुणावतील. चलबिचल मनाला कमालीचं स्थैर्य देण्याचं काम तिथली शांतता करते. अजिंठ्यात एक नादमाधुर्य आहे. एक शाश्वत, चिरंतन, प्रकाशाला साद देणारा आवाज आहे. 'भिंतीलाही कान असतात', हो, अर्थातच, पण येते भिंतींना 'वाचाही' आहे. या भिंती साधारण नाहीत. माणसाला बदलून टाकण्याचे धाडस त्यांच्यात आहे. या कलाकृती साद देतात, एक काळाची, जो चिरतरुण आहे.
अजिंठा अजरामर आहे, पारो- रॉबर्टच्या प्रेमासारखं अगदी सुंदर, कोमल पण तितकचं काटेरी, वणव्यात भस्म झालेलं, तितकचं अमर्याद पण विषाच्या परीक्षेत फसलेलं. ते तितकचं अबोल पण बोलकं, ते तितकचं पवित्र पण जगाने नाकारलेल.
प्रेम गोष्टचं अशी आहे, ज्याचा नाद माणसाला सहजासहजी जगू देत नाही, तो पेटता निखारा आहे, नवचैतन्याने भरलेले तरुण गिळंकृत करण्याची त्यात ताकद आहे. प्रेम तितकचं स्वागतार्ह आहे पण तितकच पोरकं. अजिंठ्याचा वारसा त्याचा जिवंत साक्षीदार आहे. आणि काही गोष्टी शब्दांत व्यक्त कुठे होतात! शब्द आपले बापुडे प्रयत्न करतात. पण अशाही गोष्टी आहेत, ज्या फक्त शब्दांच्या आवाक्यात नाही घेता येत. जिथं शब्द थकतात, हरतात तिथे हा वारसा काम करतो, अजिंठ्याचे तसेच आहे. सगळं काही प्रत्यक्ष दर्शनी आणून देण्याचं काम अजिंठा करते. अजिंठा एक वास्तव आहे, तितकीच कल्पना. अजिंठा एक शिल्प आहे, तितकीच प्रेरणा. अजिंठा नववधू आहे, तितकीच लंकेची पार्वती. अजिंठा एक खुले पुस्तक आहे, तितकचं एक कोड.
अजिंठा . . . अजिंठा . . .
अजिंठा एक रहस्य आहे, जे कित्येक पैलू स्वतःमध्ये सांभाळत दिमाखात उभे आहे.